मुंबई, ४ ऑगस्ट २०२६: अहमदाबादजवळील दास्तान ऑटोवर्ल्ड म्युझियममध्ये जतन करण्यात आलेल्या जागतिक कीर्तीच्या *’प्राणलाल भोगीलाल कलेक्शन’*मधील दोन दुर्मिळ ऐतिहासिक मोटारगाड्यांनी फ्रान्समध्ये भारताच्या समृद्ध ऑटोमोबाईल वारशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. १९२७ ची Hispano-Suiza H6C आणि १९३६ ची Mercedes-Benz 540K या प्रतिष्ठित वाहनांना फ्रान्समधील मुलहाउस येथे असलेल्या Musée National de l’Automobile – Collection Schlumpf येथे आयोजित प्रतिष्ठित Concours d’Élégance International स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेत Hispano-Suiza H6C ने स्पर्धेतील सर्वोच्च मानाचा ‘Best of Show’ पुरस्कार पटकावला.

प्राणलाल भोगीलाल कलेक्शनचे संरक्षक बृजेश चिनाई म्हणाले, “भारताच्या समृद्ध ऑटोमोबाईल वारशाला जागतिक स्तरावर मिळणाऱ्या वाढत्या मान्यतेचे हे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वाहनांचे संवर्धन, संशोधन आणि जतन यांद्वारे भारत आणि फ्रान्समधील दीर्घकालीन सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
” स्पर्धेनंतर या दोन्ही ऐतिहासिक वाहनांना Musée National de l’Automobile येथे आयोजित विशेष दोन महिन्यांच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, फ्रान्सच्या राष्ट्रीय ऑटोमोबाईल संग्रहालयात प्रथमच आशियातील ऐतिहासिक वाहनांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, भारताच्या ऑटोमोबाईल वारशाला मिळालेल्या जागतिक मान्यतेचा हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

या ऐतिहासिक यशानिमित्त दास्तान ऑटोवर्ल्ड म्युझियमच्या प्रतिनिधींनी फ्रान्सच्या राष्ट्रीय संसदेचे सदस्य, परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष आणि Musée National de l’Automobileच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष ब्रुनो फुक्स यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही संग्रहालयांदरम्यान ऐतिहासिक वाहनांची देवाणघेवाण, संयुक्त प्रदर्शनांचे आयोजन आणि फ्रान्स व भारत यांच्यात सांस्कृतिक, ऑटोमोबाईल तसेच औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविण्याबाबत सामायिक सहमती झाली. याबाबत ब्रुनो फुक्स म्हणाले, “दोन्ही संग्रहालयांमधील सहकार्यामुळे ऐतिहासिक वाहनांचे जतन आणि संवर्धनाला नवी दिशा मिळेल. तसेच संयुक्त प्रदर्शने आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून फ्रान्स आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, औद्योगिक आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील संबंध अधिक दृढ होतील.”
