07.03.26, वृत्तसंस्था, कोलकाता: पश्चिम बंगालच्या मतदारयाद्यांमधून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकात्याच्या मध्यवर्ती भागात धरणे आंदोलन सुरू केले.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या एस्प्लनेड येथील मेट्रो चॅनल येथे दुपारी सुमारे २.१५ वाजता हे धरणे सुरू झाले. यावेळी बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर बंगाली मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीचा मुद्दा तृणमूलच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असेल, असे संकेतही त्यांनी दिले. ‘बंगाली मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा भाजप-निवडणूक आयोगाचा कट आम्ही उघड करणार’, असे बॅनर्जी म्हणाल्या.
निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, विशेष पुनरिक्षण प्रक्रियेनंतर सुमारे ६३.६६ लाख नावे, म्हणजेच सुमारे ८.३ टक्के मतदारयाद्यांतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यातील मतदारांची संख्या सुमारे ७.६६ कोटींवरून ७.०४ कोटींवर आली आहे. याशिवाय ६०.०६ लाख मतदारांची नावे ‘पडताळणी प्रलंबित’ या वर्गात ठेवण्यात आली असून, त्यांच्या पात्रतेबाबत पुढील काही आठवड्यांत कायदेशीर पडताळणी होणार आहे.
या प्रक्रियेमुळे अनेक मतदारसंघांतील निवडणूक समीकरणांवर परिणाम होऊ शकतो. तृणमूल काँग्रेसने ही प्रक्रिया राजकीय हेतूने राबविण्यात आल्याचा आरोप केला असून यामुळे १.२ कोटींपेक्षा अधिक मतदार प्रभावित होऊ शकतात, असा दावा केला आहे. मात्र निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळला आहे. धरणे स्थळावरून बोलताना बॅनर्जी यांनी अनेक मतदारांना चुकीने मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप केला.
‘… तर बोट छाटले असते’
कोलकाता : कल्याण बॅनर्जी यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत, ‘ते निवडणूक आयुक्त नसते, तर त्यांचे बोट कापले असते’, असे वक्तव्य त्यांनी केले. या विधानावर विरोधकांनी तीव्र टीका करत तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
